५० वर्षे सत्तेत राहून पाटण कॉलनीचा प्रश्न सोडवला नाही; आता दीड वर्षाचा हिशोब मागण्याचा अधिकार कुठला ? विजय वाटेगावकरांचा नामदेव पाटील यांच्यावर हल्लाबोल; “आधी ५० वर्षांचा हिशोब द्या, मग आमदार डॉ. अतुल बाबांना जाब विचारा!”
कराड, ता. १८ : विद्या मोरे; पाटण कॉलनीतील झोपडपट्टीवासीयांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न तब्बल ५० वर्षे प्रलंबित ठेवणाऱ्यांनी आता आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या अवघ्या दीड वर्षाच्या कामाचा हिशोब मागणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को दाटे’ असा प्रकार आहे, असा घणाघात कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांच्यावर केला.
पाटण कॉलनीतील नागरिकांचा प्रश्न आजचा नाही. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असताना तो सोडविण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी निवडून आल्यानंतर तातडीने प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे आमदारांच्या कामावर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी नामदेव पाटील यांनी गेल्या ५० वर्षांत स्वतः किंवा आपल्या नेत्यांनी या प्रश्नासाठी नेमके काय केले, याचा हिशोब जनतेसमोर द्यावा, असे आव्हान वाटेगावकर यांनी दिले.
आमदारांनी पदभार घेतल्यानंतर लगेचच प्रश्न हाती घेतला
पाटण कॉलनीतील नागरिकांना कायमस्वरूपी हक्काचा निवारा मिळावा, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी निवडून आल्यानंतर तातडीने संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा सुरू केला.
१० डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी कराड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन आरक्षण क्रमांक ४८ मधील ‘पार्किंग’चे नामाभिधान बदलून ‘बेघरांसाठी घरे’ करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली.
त्यानंतर १६ डिसेंबर २०२४ रोजी कराड नगरपरिषदेने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवून संबंधित आरक्षण बदलास शासनाची परवानगी मागितली.
प्रश्न स्थानिक पातळीवरच न थांबवता १८ डिसेंबर २०२४ रोजी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले आणि पाटण कॉलनी प्रश्नावर उच्चस्तरीय हस्तक्षेपाची मागणी केली.
प्रश्न पोहोचला नगररचना विभागाच्या संचालक स्तरावर
आमदारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ८ एप्रिल २०२५ रोजी नगररचना विभागाच्या संचालक स्तरावर या प्रकरणातील पुढील पत्रव्यवहार आणि प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली.
यानंतर ५ मे २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने कराड नगरपरिषदेला या प्रकरणी पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट निर्देश दिले. संबंधित जागेचे स्थान, सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा, पार्किंगची आवश्यकता आणि इतर बाबींचा विचार करून ‘पार्किंग’चे नामाभिधान बदलून ‘बेघरांसाठी घरे’ करण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७ अन्वये प्रस्ताव सादर केल्यास शासनस्तरावर गुणवत्तेनुसार निर्णय घेतला जाईल, असे शासनाने स्पष्ट केले.
“यावरून पाटण कॉलनीचा प्रश्न आता केवळ आश्वासनांच्या पातळीवर नसून शासनाच्या प्रशासकीय प्रक्रियेत पुढे गेला आहे,” असे वाटेगावकर यांनी सांगितले.
“नामदेव पाटील यांनी आधी स्वतःच्या कामाचा हिशोब द्यावा!”
“नामदेव पाटील यांचे कराड शहराच्या विकासासाठी नेमके योगदान काय? शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी किती वेळा आवाज उठविला? किती प्रश्न मार्गी लावले? पाटण कॉलनीतील नागरिकांसाठी गेल्या ५० वर्षांत किती पत्रव्यवहार केला? किती वेळा मंत्रालयात पाठपुरावा केला? किती प्रस्ताव शासनाकडे पाठविले? याचा हिशोब त्यांनी जनतेसमोर मांडावा,” अशी मागणी वाटेगावकर यांनी केली.
“काम सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या आमदारांना प्रश्न विचारण्यापूर्वी ज्यांनी अनेक दशके या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले, त्यांनी आत्मपरीक्षण करावे. प्रसिद्धीसाठी निवेदने देण्यापेक्षा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी,” असा टोलाही त्यांनी लगावला.
“५० वर्षांचा हिशोब द्या; मग दीड वर्षाचा हिशोब मागा!”
वाटेगावकर म्हणाले, “पाटण कॉलनीतील नागरिकांचा प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित आहे. जर विरोधकांना खरोखरच या नागरिकांची काळजी असेल, तर त्यांनी राजकारण न करता आमदारांच्या पाठपुराव्याला सहकार्य करावे. मात्र, ५० वर्षांत प्रश्न सोडविण्यासाठी काय केले याचे उत्तर न देता दीड वर्षाचा हिशोब मागणे हा केवळ राजकीय दिखावा आहे.”
‘उलटा चोर कोतवाल को डाटे’
“ज्यांनी ५० वर्षे पाटण कॉलनीतील नागरिकांच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहिले नाही, तेच आज आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडे दीड वर्षाचा हिशोब मागत आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को दाटे’ अशीच आहे,” असा जोरदार घणाघात विजय वाटेगावकर यांनी केला.
पाटण कॉलनीतील नागरिकांना हक्काचा आणि कायमस्वरूपी निवारा मिळवून देण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचा शासनस्तरावरील पाठपुरावा सुरूच राहणार असून, प्रश्न अंतिम निर्णयाच्या दिशेने नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही वाटेगावकर यांनी स्पष्ट केले.
Comments
Post a Comment