कराड उपजिल्हा रुग्णालयाच्या कायापालटासाठी ४.५० कोटींचा निधी द्याआ. डॉ. अतुलबाबा भोसले यांची आरोग्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी; ना. प्रकाश आबिटकर यांची सकारात्मक ग्वाही
कराड, ता. ८ : विद्या मोरे : कराड शहरासह तालुका, ग्रामीण आणि डोंगरी भागातील हजारो नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र असलेल्या स्व. सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरण करण्यासाठी ४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली आहे.
याबाबत आ. डॉ. भोसले यांनी मुंबई येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी रुग्णालयाच्या इमारतीची सद्यस्थिती, रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच आवश्यक असलेल्या दुरुस्तीच्या कामांची सविस्तर माहिती त्यांनी आरोग्यमंत्र्यांना दिली.
कराड उपजिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. कराड शहरासह ग्रामीण आणि डोंगरी भागातील नागरिकांसाठी हे रुग्णालय आरोग्यसेवेचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र, रुग्णालयाची मुख्य इमारत तसेच आवारातील इतर इमारती जुन्या झाल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे.
पावसाळ्यात इमारतीतून गळती होत असून काही ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. जुनी विद्युत व प्लंबिंग व्यवस्था, तसेच स्वच्छतागृहांची दुरवस्था यामुळे रुग्णांसह डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट, तातडीची इमारत दुरुस्ती, वॉटरप्रूफिंग, सिव्हिल व इलेक्ट्रिकल नूतनीकरण, प्लंबिंग व्यवस्था सुधारणा आणि स्वच्छतागृहांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. रुग्णालयाची सुरक्षितता आणि आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी या कामांना शासनाने प्राधान्य द्यावे, अशी मागणी आ. डॉ. भोसले यांनी केली.
“कराड उपजिल्हा रुग्णालयावर शहरासह ग्रामीण व डोंगरी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी निधी मिळावा, याबाबत आरोग्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. लवकरच हा प्रश्न मार्गी लागून रुग्णांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होईल,” असे आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.
दरम्यान, आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत कराड उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांना दिली. त्यामुळे रुग्णालयाच्या दुरुस्तीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रस्तावित कामे
स्ट्रक्चरल ऑडिट • इमारत दुरुस्ती • वॉटरप्रूफिंग • सिव्हिल नूतनीकरण • विद्युत व्यवस्था सुधारणा • प्लंबिंग दुरुस्ती • स्वच्छतागृहांचे नूतनीकरण • सुरक्षित आरोग्य सुविधा
निधीची मागणी : ४.५० कोटी रुपये
Comments
Post a Comment