आरोपांच्या राजकारणावर बाळासाहेब पाटील संतापले; “चौकशी लावा, सत्य समोर येऊ द्या!”सह्याद्री कारखान्याच्या सभेतील गोंधळावरून राजकीय वातावरण तापले; भाजप आमदारांना थेट प्रत्युत्तर
कराड : विद्या मोरे
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील गोंधळाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. सभेतील वादानंतर आता कारखान्याचे चेअरमन तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर दिले आहे.
बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमानंतर झालेल्या जाहीर सभेत पाटील यांनी कारखान्याच्या कामकाजावरून होत असलेल्या आरोपांवर प्रश्न उपस्थित केले. “आरोप करायचे आणि संभ्रम निर्माण करायचा, हे कितपत योग्य आहे? सरकार तुमचे आहे. माझ्याविरोधात काही आक्षेप असतील तर चौकशी लावा,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.
वार्षिक सभेतील गोंधळाचा संदर्भ देताना पाटील म्हणाले की, सह्याद्रीच्या सभेची अनेक वर्षांची प्रश्नोत्तरांची परंपरा आहे. यापूर्वी सभासद तासन्तास प्रश्न विचारायचे. ज्येष्ठ सभासद संस्थेच्या कारभाराबाबत भूमिका मांडायचे. मात्र यंदाच्या सभेत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला.
सभेत झालेल्या काही आक्रमक वक्तव्यांवरही पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. “आम्ही एका मर्यादेपर्यंत संयम ठेवला आहे. कोणी अंगावर आले तर योग्य वेळी उत्तर दिले जाईल,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
कारखान्याच्या क्षमतेवर भर
सह्याद्री कारखाना यंदा पूर्ण क्षमतेने चालविण्याचे नियोजन असल्याचे पाटील यांनी सांगितले. दररोज ११ हजार टनांपेक्षा अधिक ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कारखान्याची यंत्रणा सक्षम होत असून संस्थेची वाटचाल पुढे सुरू आहे. त्यामुळेच काही विरोधकांकडून टीका होत असावी, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
वैयक्तिक आरोपांवरून थेट पलटवार
आपल्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
“सगळ्या यंत्रणा तुमच्या हातात आहेत. सरकार तुमचे आहे. माझ्याबाबत काही गैरप्रकार असल्याचे वाटत असेल तर चौकशी करा. आरोप करण्यापेक्षा सत्य समोर आणा,” असे आव्हान पाटील यांनी भाजप आमदार मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांना दिले.
“सह्याद्रीच्या वाघांना भीती कसली?”
कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन करतानाच पाटील यांनी आक्रमक भाषेत आपली भूमिका स्पष्ट केली. “सह्याद्रीचे वाघ मुक्तपणे फिरतात. कोणाच्या धमकीला घाबरण्याचे कारण नाही. मात्र संस्थेचे हित लक्षात घेऊन आम्ही संयम ठेवत आहोत,” असा संदेश त्यांनी दिला.
सह्याद्री कारखान्याच्या सभेतील वाद आता थेट राजकीय आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचल्याने कराडच्या राजकीय वर्तुळात या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Comments
Post a Comment