कोणाला निवडणुका जिंकण्यास मदत करत होते? ’निवडणूक आयोगाच्या कारभारावर पृथ्वीराज चव्हाणांचा थेट सवाल; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटविण्याची मागणी
कराड : विद्या मोरे
चौकशीची मागणी : निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेला अहवाल गंभीर असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
घटनात्मक संस्थेचा संदर्भ : पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये निवडणूक आयोग ही भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ अंतर्गत स्थापन झालेली घटनात्मक संस्था असल्याचे नमूद केले. निवडणूक आयुक्तांचे अधिकार आणि भूमिका याबाबत सर्वोच्च न्यायालयाने १९९५ मधील टी. एन. शेषन विरुद्ध भारत सरकार प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
निर्णयप्रक्रियेवर सवाल : ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्ताचा हवाला देत पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या सहकारी निवडणूक आयुक्तांशी चर्चा न करता आयोगाच्या वतीने काही निर्णय घेतल्याचा आरोप केला. या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
थेट सवाल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून अधिकाराचा गैरवापर झाल्याचा आरोप करत पृथ्वीराज चव्हाण यांनी, “ते कोणाला निवडणुका जिंकण्यास मदत करत होते?” असा थेट सवाल उपस्थित केला. या आरोपांची सत्यता निष्पक्ष चौकशीतून समोर यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आयोगाच्या स्पष्टीकरणावर प्रश्न : निवडणूक आयोगाने ‘आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतले’ असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, हे स्पष्टीकरण तपासाअंती टिकते का, याची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. आयोगातील सदस्यांमध्ये मतभेद असू शकतात; मात्र कायद्यानुसार निर्णय एकमताने किंवा बहुमताने सामूहिकरीत्या घेतले जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रपतींच्या भेटीची मागणी : या प्रकरणी काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीतील नेत्यांची तातडीने बैठक बोलवावी. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करण्याची मागणी करावी, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी : आवश्यक असल्यास सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच राज्यघटनेत नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करण्यासाठी विरोधी पक्षाने प्रस्ताव मांडावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
लोकशाहीबाबत गंभीर इशारा : “हा विषय अत्यंत गंभीर आहे. निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काही अर्थच नाही,” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कारवाई करून त्यांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment