कराड दक्षिणमध्ये दुष्काळी परिस्थितीची आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडून पाहणी आठ गावांतील पीक नुकसानीचा घेतला आढावा; शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा
कराड, ता. २८ : विद्या मोरे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची आणि पिकांच्या नुकसानीची आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. मनव, साळशिरंबे, महारूगडेवाडी, बोत्रेवाडी, आकाईचीवाडी, जिंती, टाळगाव आणि घोगाव या गावांना भेट देत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भुईमूग, सोयाबीनसह विविध पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. भोसले यांनी शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष नुकसानीची माहिती घेतली.
सर्वेक्षण व पंचनाम्याच्या सूचना
पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आमदार डॉ. भोसले यांनी संबंधित कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नुकसानग्रस्त पिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शासनाच्या मदतीपासून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहू नये, यासाठी योग्य पद्धतीने नुकसानीची नोंद करण्यावर त्यांनी भर दिला.
कराड तालुक्यातील ज्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या भागांचा दुष्काळी परिस्थितीच्या निकषांमध्ये समावेश करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
कराड दक्षिणमधील दुष्काळी परिस्थितीची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि कराड तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करावा, यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले असून दूरध्वनीवरूनही चर्चा केली असल्याचे आमदार डॉ. भोसले यांनी सांगितले.
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, नुकसानग्रस्त पिकांचे योग्य सर्वेक्षण व पंचनामे व्हावेत आणि शासनाच्या मदतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी पुढील काळातही शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
“शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही”
“शेतकऱ्यांवर आलेल्या या कठीण परिस्थितीत त्यांना एकटे सोडले जाणार नाही. पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना न्याय्य मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू. पाण्याचे व्यवस्थापन आणि भविष्यातील पीक नियोजनाबाबतही संबंधित विभागांसोबत चर्चा करण्यात येईल,” अशी प्रतिक्रिया आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
Comments
Post a Comment