राहुल गांधीं सोबत नामदेव पाटील आप्पा कुटुंबीयांचा स्नेह संवाद साताऱ्याच्या ऐतिहासिक परंपरेची दिली माहिती; युवक-विद्यार्थ्यांशी संवादासाठी जिल्हा भेटीचे निमंत्रण

कराड : विद्या मोरे 

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानांतर्गत’ आयोजित जिल्हाध्यक्षांच्या राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील आप्पा आणि त्यांच्या कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधला. या भेटीत सातारा जिल्ह्याची स्वातंत्र्यसैनिकांची गौरवशाली परंपरा, युवक-विद्यार्थ्यांमधील सामाजिक प्रश्नांविषयीची उत्सुकता आणि काँग्रेस संघटना बळकट करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा झाली.

दहा दिवस चाललेल्या या निवासी प्रशिक्षण शिबिराचा समारोप बुधवारी राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला. समारोप कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांनाही विशेष निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थित जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांशी आवर्जून परिचय करून घेत आस्थेने संवाद साधला.

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील आप्पा यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदा पाटील माई, मुलगा सत्यजित पाटील, कन्या स्नेहल पाटील, नातू देवराज पाटील तसेच भाऊ मुकुंद पाटील यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधल्याने भेटीला विशेष कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले.

सातारा भेटीचे निमंत्रण

संवादादरम्यान नामदेव पाटील आप्पा यांनी सातारा जिल्ह्याला लाभलेली स्वातंत्र्यसैनिकांची गौरवशाली परंपरा राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून दिली. सातारा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी आणि युवक राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्यास उत्सुक असून, त्यांनी सातारा जिल्ह्यात येऊन युवक, विद्यार्थी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी नामदेव पाटील आप्पा यांनी राहुल गांधी यांना सातारा जिल्हा भेटीचे विशेष निमंत्रण दिले.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटन बळकट करण्याचा प्रयत्न

माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे नामदेव पाटील यांनी सांगितले. तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवून संघटनेला अधिक सक्षम करण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या या भेटीमुळे नामदेव पाटील आप्पा आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय नेतृत्वाशी झालेला हा स्नेहपूर्ण संवाद जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि विद्यार्थ्यांची राहुल गांधी यांच्यासोबत व्यापक भेट घडवून आणण्यासाठी दिल्ली येथे वेळ घेऊन पुन्हा भेट घेणार असल्याचे नामदेव पाटील आप्पा यांनी सांगितले.

“राहुल गांधी यांच्यासोबत झालेला संवाद अत्यंत प्रेरणादायी ठरला. त्यांच्या विचारांमधून आणि संवादातून काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नव्या उत्साहाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. सातारा जिल्ह्यातील युवक, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद घडवून आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू,” असे नामदेव पाटील आप्पा यांनी सांगितले.


Comments

Popular posts from this blog

कराड नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार मैदानात; भाजप, काँग्रेससह अपक्षांची जोरदार उपस्थिती

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार