नारीशक्तीच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ; इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमचा महिला महोत्सव जल्लोषात संपन्न!मिस कराडच्या मुकुटावर रमा कांबळेची मोहोर; मिसेस कराडचा किताब दीपा शेटेनवार यांना — जिजाऊ पुरस्काराने डॉ. रुपाली देसाई सन्मानित

 
कराड :  विद्या मोरे

महिलांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्यातील आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देणारा इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमचा तीन दिवसीय पाचवा महिला महोत्सव उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. विविध स्पर्धा, सामाजिक उपक्रम आणि नारीशक्तीचा गौरव अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी सजलेल्या या महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष आकर्षण ठरलेल्या ‘मिस कराड’ आणि ‘मिसेस कराड’ स्पर्धेने महोत्सवात रंगत आणली.

महिलांना स्वतःमधील कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा आणि त्यांना विविध क्षेत्रांत पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या महोत्सवात पिंक मॅरेथॉनच्या माध्यमातून कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात आली. यासोबतच पाककला, मेहंदी, योगासन आणि नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

महोत्सवाच्या प्रमुख पाहुण्या जिजाई मसालेच्या सौ. वैशाली भोसले आणि अजंठा डेव्हलपर्सचे श्री. तनय जाधव उपस्थित होते. चार्टर्ड प्रेसिडेंट छाया पवार, प्रेसिडेंट मनीषा पाटील आणि सेक्रेटरी हेमलता फुटाणे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. चार्टर्ड प्रेसिडेंट छाया पवार यांनी इनरव्हील क्लबच्या कार्याची माहिती देताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिला महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले.

इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या माध्यमातून विविध सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्याबरोबरच समाजोपयोगी कार्यात क्लब नेहमीच अग्रेसर असतो, असे प्रेसिडेंट मनीषा पाटील यांनी सांगितले. पीडीसी मुक्ती जी. पानसे यांनी क्लबच्या विविध उपक्रमांचे भरभरून कौतुक केले.

नारीशक्तीचा ‘जिजाऊ पुरस्कार’ने गौरव

समाजात शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नारीशक्तीचा गौरव करण्यासाठी यंदाचा ‘जिजाऊ पुरस्कार’ डॉ. सौ. रुपाली देसाई यांना प्रदान करण्यात आला. या सन्मानातून महिलांच्या कर्तृत्वाला आणि समाजातील त्यांच्या योगदानाला विशेष दाद देण्यात आली.

‘मिस कराड’ आणि ‘मिसेस कराड’ स्पर्धेचे विजेते

महोत्सवाचे खास आकर्षण ठरलेल्या ‘मिस कराड’ स्पर्धेत रमा कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रांजल जाधव यांनी द्वितीय, तर आम्रपाली माने यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

‘मिसेस कराड’ स्पर्धेत दीपा शेटेनवार यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तृप्ती साळुंखे यांनी द्वितीय, तर सिमरन शीलवंत यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. या महोत्सवामुळे आपल्याला स्वतःचे कौशल्य सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले, अशी भावना स्पर्धकांनी व्यक्त करत इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमचे आभार मानले.
 प्राईड ऑफ इनरव्हील पुरस्कार                           दरवर्षी क्लबच्या वतीने प्रदान करण्यात येणारा ‘प्राईड ऑफ इनरव्हील’ पुरस्कार यंदा डिस्ट्रिक्ट ३१३ आणि इनरव्हील क्लब निगडी प्राईडच्या माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्तीजी पानसे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मुक्तीजी पानसे यांनी इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या विविध उपक्रमांचे आणि सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले.
सामूहिक सहकार्यातून महोत्सव यशस्वी

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया पवार, सुषमा तिवारी, अनिता शुक्ला आणि श्रुती कदम यांनी केले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवर पदाधिकारी, प्रेक्षक, स्पर्धक आणि क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढील वर्षी आणखी नाविन्यपूर्ण उपक्रमांसह महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा छाया पवार यांनी केली. प्रेसिडेंट मनीषा पाटील आणि सेक्रेटरी हेमलता फुटाणे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, प्रेक्षक, स्पर्धक आणि क्लब सदस्यांचे आभार मानले.

महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन, कर्करोग जनजागृती, सामाजिक बांधिलकी आणि नारीशक्तीचा गौरव यांचा सुंदर संगम साधणारा हा पाचवा महिला महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार

कराडमध्ये २१९७ रेशन कार्डधारक अपात्र; साहिला नायकवडे यांच्यासह संबंधितांची विभागीय चौकशी कराशासनाच्या अधिकृत यादीबाहेरील लाभार्थ्यांना कोणत्या निकषांवर अपात्र केले? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे स्पीड पोस्टाने तक्रार; नियमबाह्य कार्यवाहीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही ची मागणी २१९७ लाभार्थी अपात्र; प्रकरणाची विभागीय चौकशीची मागणी