काले गावाच्या नळ पाणीपुरवठा योजनेस २.९५ कोटींचा निधी मंजूर आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने कामाला गती
कराड : विद्या मोरे
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काले गावाच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २ कोटी ९५ लाख ७५ हजार रुपयांच्या सुधारित निधीला महायुती शासनाने मंजुरी दिली आहे. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, जलजीवन मिशनअंतर्गत या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे योजनेच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असून, कामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कराड तालुक्यातील काले गावातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नळ पाणीपुरवठा योजनेला निधी मंजूर करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून या योजनेस यापूर्वी १ कोटी ९९ लाख १९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे योजनेच्या खर्चात वाढ झाल्याने प्रत्यक्ष काम सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे वाढीव निधी उपलब्ध करून देण्यासह सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक होते.
या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुंबई येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कालेसह अन्य गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा मंत्र्यांसमोर मांडला. जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर झालेल्या काही योजनांच्या खर्चात वाढ झाल्यामुळे आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली.
गावांमधील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या योजनांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे नमूद करत, वाढीव खर्चासह संबंधित योजनांना तातडीने सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. भोसले यांनी निवेदनाद्वारे केली होती.
या मागणीची दखल घेत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने काले गावाच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २ कोटी ९५ लाख ७५ हजार रुपयांच्या सुधारित निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या १ कोटी ९९ लाख १९ हजार रुपयांच्या निधीच्या तुलनेत आता ९६ लाख ५६ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीतील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटण्याची आशा
काले गावातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीने निधी मंजुरीचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने योजनेच्या कामाला गती मिळून ती लवकरात लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यामुळे गावातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असून, ग्रामस्थांना दिलासा मिळण्याची आशा आहे.
या निधी मंजुरीबद्दल काले ग्रामस्थांकडून महायुती शासन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
Comments
Post a Comment