दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजारांची अग्रिम मदत; अतुलबाबा भोसले यांच्याकडून देवाभाऊंचे अभिनंदन ३०५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारच्या उपाययोजना
कराड : विद्या मोरे
महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असून, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे नियोजन, जनावरांसाठी चारा उपलब्धता आणि पीक नियोजनावर सरकारने भर दिला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांकडून हमीभावाने चारा खरेदी करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आमदार भोसले यांनी नमूद केले.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी सक्त सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत असून, या प्रयत्नांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यातील दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती असून, या संकटाचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी राजकारण करण्याऐवजी जनहिताला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका आमदार भोसले यांनी मांडली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकरी कुटुंबांना वार्षिक १२ हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जात आहे. पीएम किसान सन्मान निधी, नमो शेतकरी योजना, पीकविमा योजना आणि कृषिपंपांच्या वीजबिलासंदर्भातील सवलती अशा विविध योजनांमधून शेतकऱ्यांना मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दोन हजार रुपयांची भाऊबीज देण्याच्या निर्णयाचाही त्यांनी उल्लेख केला. शेतकरी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
कर्नाटकातील शेतकऱ्यांना अडीच हजारांची मदत; भोसले यांची टीका
महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसहाय्य जाहीर केले असताना, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ अडीच हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केल्याचा दावा आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केला. महाराष्ट्रातील मदत कर्नाटकाच्या तुलनेत दुप्पट असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसशासित राज्यांनीही शेतकऱ्यांच्या हितासाठी अशाच प्रकारच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले.
दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत आणि सरकारच्या उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन आमदार डॉ. भोसले यांनी केले.
Comments
Post a Comment