काँग्रेसच्या आंदोलना मुळेच कराडचा दुष्काळी यादीत समावेश! पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा; बाबुराव पवार यांचा सरकारवर हल्लाबोल
कराड : विद्या मोरे
कराड तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी काँग्रेसने केलेल्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळेच सरकारला निर्णय घ्यावा लागला, असा दावा कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष बाबुराव पवार यांनी केला. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना केवळ पाच हजार रुपयांची मदत देणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याची टीकाही त्यांनी केली.
राज्य सरकारने खरीप हंगाम २०२६ साठी जाहीर केलेल्या अंतिम दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत सातारा जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा समावेश केला आहे. मात्र, सुरुवातीच्या यादीत कराडचा समावेश नसल्याने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेतली.
त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सरकारकडे मंडलनिहाय सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली. तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन आणि उपोषणाचा इशाराही देण्यात आला. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच कराडचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्याचा दावा पवार यांनी केला. भाजपचे तीन आमदार असतानाही सुरुवातीच्या यादीत कराडला स्थान मिळाले नव्हते, यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले असून, बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि सिंचनाचा खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत ही रक्कम अपुरी असून, सरकारने भरीव आर्थिक मदत, पीक नुकसानभरपाई आणि कर्जमाफी तातडीने द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.
“केवळ दुष्काळ जाहीर करून सरकारची जबाबदारी संपत नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात पुरेशी मदत जमा झाली पाहिजे. पाच हजारांची मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा करू नका,” असा इशारा बाबुराव पवार यांनी दिला.
Comments
Post a Comment