स्तन कर्करोगाच्या लढ्यात आशा स्वयंसेविका ठरणार महत्त्वाचा दुवा; डॉ. सुरेश भोसले यांचे आवाहन ग्रामीण महिलांमध्ये जनजागृती साठी गावोगावी मोहीम राबविण्यावर भर; प्राथमिक तपासणीचे प्रशिक्षण देण्याचा कृष्णा विद्यापीठाचा संकल्प

 
कराड, ता. ३१ : विद्या मोरे

कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास प्रभावी उपचारांद्वारे रुग्णाला या आजारातून बरे करणे शक्य आहे. मात्र, ग्रामीण भागात आजही स्तन कर्करोगाबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने अनेक महिलांचे निदान उशिरा होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी गावोगावी जाऊन महिलांमध्ये स्तन कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
ऑक्टोबर महिना स्तन कर्करोग जनजागृती महिना म्हणून पाळला जातो. यानिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आशा स्वयंसेविकांसाठी आयोजित कर्करोग जनजागृती कार्यक्रमात डॉ. भोसले बोलत होते.

व्यासपीठावर कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कराड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता थोरात, कृष्णा हॉस्पिटलचे कर्करोग विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर, किमोथेरपी तज्ज्ञ डॉ. रश्मी गुडूर आणि अमोल पाटील उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, की आरोग्य यंत्रणा आणि ग्रामीण जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून आशा स्वयंसेविका काम करतात. कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीती व मानसिक तणाव निर्माण होतो. अशावेळी आशा स्वयंसेविका रुग्णांना मानसिक आधार देऊन त्यांच्यात उपचारांविषयी विश्वास निर्माण करतात. त्यामुळे स्तन कर्करोगाच्या जनजागृती मोहिमेतही त्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.

ग्रामीण भागात मॅमोग्राफीसारख्या तपासणी सुविधा सर्वत्र उपलब्ध नसल्याने महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन कृष्णा हॉस्पिटलने ‘हँडहेल्ड इंटेलिजंट ब्रेस्ट एक्झामिनेशन’ उपकरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिलांची प्राथमिक तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच रोटरी इंटरनॅशनलच्या सहकार्याने ‘आशा एक्स्प्रेस’ ही विशेष बस उपलब्ध झाली असून, या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांपर्यंत थर्मोग्राफिक तपासणीची सुविधाही पोहोचविण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यातील महिलांपर्यंत आरोग्यविषयक माहिती आणि तपासणी सुविधा पोहोचविणे मोठे आव्हान आहे. या कामात आशा स्वयंसेविकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. भविष्यात प्रत्येक आशा स्वयंसेविकेला प्राथमिक तपासणीचे प्रशिक्षण देण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

कृष्णा हॉस्पिटलने ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत. विशेषतः महिलांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर जनजागृती आणि तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम कौतुकास्पद आहे. कराड तालुक्यासह परिसरातील ग्रामीण व तळागाळातील महिलांपर्यंत स्तन कर्करोगाविषयी माहिती पोहोचविण्यासाठी आशा स्वयंसेविका निश्चितच मोलाचे सहकार्य करतील, असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता थोरात यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात डॉ. आनंद गुडूर यांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये कर्करोग निदान आणि उपचारांसाठी उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधांची माहिती दिली. कृष्णा हॉस्पिटलमध्ये टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी सुविधांसह कर्करोग रुग्णांसाठी विशेष पॅलिएटिव्ह केअर सेंटरही कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डॉ. सुनीता थोरात, डॉ. प्रणिता पाटील व डॉ. पंकज पाटील यांनी कर्करोग जनजागृतीपर सादरीकरण केले.

विद्या पाटील व अलिना जिनो यांनी सूत्रसंचालन केले. गायत्री कुलकर्णी यांनी स्वागतगीत सादर केले, तर वर्षा चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील, संशोधन संचालिका निवृत्त ब्रिगेडियर डॉ. जी. हिमाश्री, उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, दंतविज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंगच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे, फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव, नर्सिंग डायरेक्टर सौ. रोहिणी बाबर, डॉ. प्रणिता पाटील, चिंतामणी लकडे यांच्यासह आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

चौकट : जनजागृती साहित्य घराघरांत पोहोचविणार

महिलांनी स्तन स्व-तपासणी कशी करावी, याची माहिती देण्यासाठी कृष्णा विद्यापीठातर्फे विशेष पुस्तिका व मार्गदर्शक साहित्य तयार करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून ते घराघरांत पोहोचविण्यात येणार असल्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.

फोटो ओळ : कराड : कृष्णा विश्व विद्यापीठ व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्करोग जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. सुरेश भोसले.

Comments

Popular posts from this blog

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार

कराडमध्ये २१९७ रेशन कार्डधारक अपात्र; साहिला नायकवडे यांच्यासह संबंधितांची विभागीय चौकशी कराशासनाच्या अधिकृत यादीबाहेरील लाभार्थ्यांना कोणत्या निकषांवर अपात्र केले? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे स्पीड पोस्टाने तक्रार; नियमबाह्य कार्यवाहीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही ची मागणी २१९७ लाभार्थी अपात्र; प्रकरणाची विभागीय चौकशीची मागणी