कृष्णा कारखान्या समोरील रस्त्याच्या चौपदरी करणासाठी ८ कोटींचा निधी मंजूर !डॉ. सुरेश भोसले व आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; केंद्रीय मार्ग निधीतून होणार रस्त्याचे काँक्रीटीकरण
ऊस वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग
शेरे, दुशेरे, रेठरे बुद्रुक (इंजिन पाणंद) आणि खुबी या गावांना जोडणारा हा रस्ता आहे. राष्ट्रीय महामार्ग २६६ ई आणि राज्य महामार्ग १४८ यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणूनही या मार्गाची ओळख आहे. कराड दक्षिणमधील अनेक गावांसह वाळवा तालुक्यातील गावांच्या दळणवळणासाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरतो.
कृष्णा कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू असताना या रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. त्याचबरोबर खासगी वाहने, शेतकरी, विद्यार्थी आणि नोकरदारांचीही या मार्गावरून नियमित ये-जा असते. वाढती वाहतूक आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.
शासनस्तरावरील पाठपुराव्याला यश
परिसरातील नागरिकांची आणि शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या कामासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या रस्त्याच्या विकासासाठी केंद्रीय मार्ग निधी (CRIF) मधून ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
वाहतूक अधिक सुरक्षित, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
या निधीतून रस्त्याचे चौपदरीकरण आणि काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्याची वाहतूक क्षमता वाढणार असून वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे. विशेषतः ऊस हंगामात कारखान्याकडे येणाऱ्या ऊस वाहतूक वाहनांची कोंडी कमी होण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांना ऊस आणि इतर शेतीमाल कारखाना तसेच बाजारपेठेत पोहोचवणे अधिक सोयीचे होणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रवास, नोकरदारांची ये-जा आणि परिसरातील नागरिकांची दैनंदिन वाहतूकही अधिक सुलभ होणार आहे.
ग्रामीण विकासाला मिळणार नवी चालना
कराड आणि वाळवा तालुक्यांतील अनेक गावांना जोडणाऱ्या या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या विकासामुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. शेती, सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला याचा सकारात्मक फायदा होण्याची अपेक्षा आहे.
या विकासकामासाठी निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे परिसरातील नागरिक आणि शेतकरी वर्गातून आभार व्यक्त होत आहेत.
Comments
Post a Comment