कराडमध्ये २४ नोव्हेंबरपासून कृषी तंत्रज्ञानाचा महाकुंभ!२१ वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन पाच दिवस रंगणार ; दुष्काळी शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि पशुधन व्यवस्थापनावर विशेष भर अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते प्रदर्शन मंडपाचे भूमिपूजन

कराड : विद्या मोरे 

शेतीसमोरील बदलती आव्हाने, नैसर्गिक संकटे आणि वाढता उत्पादन खर्च यावर मात करत शेती अधिक फायदेशीर व आधुनिक बनविण्यासाठी शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान आणि प्रयोगांची माहिती मिळणे आवश्यक आहे. याच उद्देशाने कराडमध्ये २१ व्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजार तळावर पाच दिवस हे भव्य राज्यस्तरीय प्रदर्शन भरविण्यात येणार असून, त्यातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा नवा दृष्टिकोन मिळणार आहे.

या प्रदर्शनाच्या मंडपाचे भूमिपूजन शुक्रवारी सातारा जिल्हा परिषद सदस्य तथा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते कुदळ मारून व श्रीफळ फोडून करण्यात आले.

कराड कृषी उत्पन्न बाजार समिती, राज्य शासनाचा कृषी विभाग आणि जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. आधुनिक कृषी यंत्रसामग्री, प्रगत तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, शेतीतील नवनवीन प्रयोग, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि पशुसंवर्धन अशा विविध विषयांची माहिती या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहे. शेती क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, कृषीपूरक व्यवसाय आणि आधुनिक उपकरणांची माहिती शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी मिळणार असल्याने हे प्रदर्शन कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.

यावेळी बोलताना अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुमारे २० ते २१ वर्षांपूर्वी काकांनी या कृषी प्रदर्शनाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळावी आणि प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, या हेतूने सुरू झालेली ही परंपरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आजही यशस्वीपणे सुरू आहे.

शेतीमध्ये काळानुरूप बदल स्वीकारणे गरजेचे असून, नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास उत्पादनवाढीसह शेती अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अशा विविध संधींची माहिती मिळणार आहे. येत्या २५ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, कृषिमंत्री तसेच जिल्ह्यातील सर्व मंत्री यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विशेष मार्गदर्शन

यंदा महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या प्रदर्शनात दुष्काळी शेती व्यवस्थापन आणि पशुधन संवर्धन या विषयांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. कमी पाण्यात पिकांचे नियोजन, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, प्रतिकूल हवामानात पिकांचे संरक्षण, शेतीपूरक व्यवसायांची माहिती तसेच दुष्काळाच्या काळात जनावरांचे संगोपन व व्यवस्थापन कसे करावे, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत शेतकऱ्यांना केवळ माहितीच नव्हे, तर प्रत्यक्ष शेतीमध्ये उपयोगी पडणारे तंत्रज्ञान आणि उपाययोजना उपलब्ध करून देण्याचा बाजार समितीच्या संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या भूमिपूजनप्रसंगी बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे, संचालक प्रकाश पाटील, संभाजी चव्हाण, राजेंद्र चव्हाण, गणपत पाटील, जगन्नाथ लावंड, उद्धवराव फाळके, धनाजी काटकर, प्रदीप पाटील, साहेबराव शेवाळे, अॅड. शंकरराव लोकरे, अनिल मोहिते, जे. डी. मोरे, उत्तमराव जगताप, बाबुराव धोकटे, शिवाजीराव जाधव, फत्तेसिंह जाधव, सचिन मोहिते, सागर जाधव, तानाजी जाधव, शहाजी शेवाळे, मुनीरभाई बागवान, संपतराव खबाले, बळवंत पाटील, हिम्मत थोरात यांच्यासह प्रभारी सचिव आबासो पाटील, बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 

Comments

Popular posts from this blog

बनवडी ग्रामपंचायतीतील पाणी योजनेतील गैरव्यवहाराचा भांडाफोड तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र; प्रशासनाची कठोर कारवाई

कऱ्हाडचे सुपुत्र सुभेदार धनंजय यादव यांचे जल्लोषात स्वागत २८ वर्षांच्या उज्ज्वल लष्करी सेवेनंतर कऱ्हाडमध्ये भव्य सत्कार

कराडमध्ये २१९७ रेशन कार्डधारक अपात्र; साहिला नायकवडे यांच्यासह संबंधितांची विभागीय चौकशी कराशासनाच्या अधिकृत यादीबाहेरील लाभार्थ्यांना कोणत्या निकषांवर अपात्र केले? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे स्पीड पोस्टाने तक्रार; नियमबाह्य कार्यवाहीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही ची मागणी २१९७ लाभार्थी अपात्र; प्रकरणाची विभागीय चौकशीची मागणी