बातम्यांसाठी पत्रकार हवेत; जाहिरातींचे पैसे देताना मात्र नाक मुरडता? पत्रकारांच्या मेहनतीचा अपमान कशासाठी?प्रसिद्धी हवी, बातमी हवी, फोटो हवा, नाव झळकायला हवे; पण पत्रकारांच्या मेहनतीचे पैसे देण्याची वेळ आली की बजेटचे रडगाणे! ही कसली मानसिकता?
समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि लोकांच्या प्रश्नांवर निर्भीडपणे लेखणी चालवणारा पत्रकार आज स्वतःच्या हक्काच्या मोबदल्यासाठी संघर्ष करत आहे. समाजाला आरसा दाखवणाऱ्या पत्रकाराला मात्र समाजातील प्रतिष्ठित म्हणवणाऱ्या काही लोकांकडूनच आर्थिक वास्तवाचा आरसा दाखवला जात आहे.
पत्रकार हवा असतो प्रत्येकाला! कार्यक्रमाची बातमी छापण्यासाठी, फोटो प्रसिद्ध करण्यासाठी, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, सत्कार समारंभाला प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःचे राजकीय, सामाजिक अस्तित्व दाखवण्यासाठी पत्रकारांची आठवण होते. मात्र जाहिरातीचे बिल देण्याची वेळ आली की अचानक बजेट संपते, परिस्थिती बिकट होते आणि फोन उचलण्याचीही तसदी घेतली जात नाही.
अहो, प्रसिद्धी मोफत मिळावी अशी अपेक्षा ठेवणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, पत्रकाराची लेखणी चालते ती मेहनतीवर; तुमच्या उपकारांवर नाही!
काही लोकांना पत्रकारांनी त्यांच्या कार्यक्रमाची बातमी पहिल्या पानावर हवी असते. फोटो मोठा हवा, मथळा आकर्षक हवा, नाव ठळक हवे; पण जाहिरातीचे पैसे द्यायचे म्हटले की शंभर कारणे तयार असतात. मग प्रश्न असा पडतो की, पत्रकारांनी तुमच्या प्रसिद्धीसाठी स्वतःच्या खिशातून खर्च करायचा का?
पत्रकार हा काही २४ तास मोफत सेवा देणारा कर्मचारी नाही. त्यालाही घर आहे, संसार आहे, मुलांचे शिक्षण आहे, वीजबिल आहे, घरभाडे आहे. बातमीसाठी दुचाकीवर फिरताना पेट्रोल लागते, मोबाईलला रिचार्ज लागतो, इंटरनेट लागते, वृत्तपत्र चालवण्यासाठी आर्थिक पाठबळ लागते. या सगळ्याचा खर्च पत्रकारानेच करायचा आणि प्रसिद्धीचे श्रेय मात्र इतरांनी घ्यायचे, ही कुठली न्यायाची पद्धत?
विशेष म्हणजे, समाजसेवेच्या गप्पा मारणारे, मोठमोठ्या पदांवर बसलेले आणि लाखोंच्या कार्यक्रमांचे आयोजन करणारे काही जण पत्रकारांच्या जाहिरातीच्या बिलासाठी मात्र हात आखडता घेतात. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी खर्च करताना उदारता दाखवली जाते; पण पत्रकाराच्या मेहनतीचे पैसे देताना मात्र काटकसर आठवते.
पत्रकारांच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेणे बंद करा!
पत्रकार बातमी देतो म्हणून तो जाहिरातदाराचा गुलाम होत नाही. पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. बातमी देणे हे पत्रकाराचे काम असले तरी जाहिरात प्रसिद्ध करणे ही व्यावसायिक सेवा आहे. त्याचा मोबदला वेळेत मिळणे हा पत्रकार आणि वृत्तपत्राचा हक्क आहे.
आणखी एक गंभीर बाब म्हणजे पत्रकाराने एखाद्या चुकीच्या गोष्टीवर प्रश्न उपस्थित केला, तर लगेच नाराजी व्यक्त केली जाते. जाहिरात बंद करण्याची धमकी दिली जाते. काही जण तर जाहिरातीच्या पैशांचा वापर पत्रकारितेवर दबाव आणण्यासाठी करतात. ही प्रवृत्ती पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी घातक आहे.
पत्रकारांनीही आता आत्मसन्मान जपण्याची वेळ आली आहे. जाहिरात देणाऱ्यांचा सन्मान नक्कीच करा; पण स्वतःच्या मेहनतीचा अपमान सहन करू नका. जाहिरात घेतली असेल तर त्याचे पैसे मागणे ही भीक मागणे नाही, तर आपल्या कामाचा मोबदला मागणे आहे.
एक प्रश्न अशा सर्वांना आहे : तुमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळाली नाही तर तुम्हाला वाईट वाटते; मग तुमच्या प्रसिद्धीसाठी रात्रंदिवस धावणाऱ्या पत्रकाराच्या घरातील चूल कशी पेटते, याचा कधी विचार केला आहे का?
पत्रकाराला सन्मानपत्र नको असे नाही, पुष्पगुच्छ नको असे नाही; पण त्यापेक्षा त्याच्या मेहनतीचे योग्य पैसे आणि वेळेत मोबदला अधिक महत्त्वाचा आहे.
आता पत्रकारांनीही एक गोष्ट ठामपणे सांगण्याची गरज आहे — बातमीची अपेक्षा असेल तर पत्रकाराचा सन्मान करा, जाहिरात हवी असेल तर तिचे पैसे द्या आणि प्रसिद्धी हवी असेल तर तिची किंमत समजून घ्या.
कारण पत्रकाराची लेखणी विकाऊ नाही, पण त्याची मेहनत नक्कीच अमूल्य आहे. प्रसिद्धीचा फायदा तुम्हाला आणि खर्च मात्र पत्रकाराने करायचा, हा अन्याय आता थांबलाच पाहिजे!
Comments
Post a Comment