झोपडपट्टीतील चिमुकल्यांसाठी आनंदाची मेजवानी! रुक्मिणीनगरमध्ये ५० बालकांचा बालदिन जल्लोषात
बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासोबतच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देत स्वच्छता, शिक्षण आणि चांगल्या सवयींचा संदेश देणारा बालदिन सोहळा कराड येथील रुक्मिणीनगर झोपडपट्टीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कौशल्य विकास व संशोधन केंद्र, कराड यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात सुमारे ५० चिमुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबर रोजी देशभर बालदिन साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून मंगळवार पेठेतील रुक्मिणीनगर झोपडपट्टी परिसरात मुलांसाठी विविध मनोरंजक खेळ, स्पर्धा, बक्षीस वितरण आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात चेंडू एकमेकांकडे देण्याचा खेळ, दोन मुलांचे एकेक पाय बांधून शर्यत, लंगडीची शर्यत तसेच फुल बॅट अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. मुलांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सर्व खेळांमध्ये सहभाग घेतला. स्पर्धेतील चुरस, खेळकर वातावरण आणि चिमुकल्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर आनंदाने भारावून गेला.
खेळांचा आनंद लुटल्यानंतर सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक मुलाला टूथब्रश, टूथपेस्ट आणि साबण भेटवस्तू म्हणून देण्यात आले. या भेटवस्तूंच्या माध्यमातून मुलांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी मुलांनी नियमित शाळेत जावे, मन लावून अभ्यास करावा, चांगल्या सवयी अंगीकाराव्यात आणि खेळांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा, याबाबत मार्गदर्शन करून प्रबोधन करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक श्री. सौरभ तात्या पाटील उपस्थित होते. तसेच कौशल्य विकास व व्यवस्थापन केंद्राच्या प्रमुख डॉ. सुप्रिया डिसूझा, संचालक सदस्य श्री. शंकर वेताळ, श्री. चंद्रशेखर नकाते, नगरपालिकेचे निवृत्त अभियंता श्री. ए. आर. पवार, रुक्मिणीनगर झोपडपट्टीतील श्री. सावळ्या जावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.
बालकांच्या आनंदात सहभागी होत त्यांना शिक्षण, स्वच्छता आणि संस्कारांची शिदोरी देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. बालदिनाच्या निमित्ताने रुक्मिणीनगरमधील चिमुकल्यांसाठी आनंदाचे अविस्मरणीय क्षण निर्माण झाले.
Comments
Post a Comment