दिवाळी फराळाच्या निमित्ताने कराडमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर!छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुपचा स्तुत्य उपक्रम; सर्व धर्म समभाव, माणुसकी आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश
कराड : विद्या मोरे
दिवाळीच्या सणाचा आनंद द्विगुणित करत हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा अनोखा दिवाळी फराळ कार्यक्रम कराडमध्ये उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी उद्यान व विजय दिवस समारोह समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यानात व्यायामासाठी येणारे मुस्लिम बांधव तसेच शिवाजीनगर हाउसिंग सोसायटीतील मुस्लिम बांधवांसाठी या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार, दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री. चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम संपन्न झाला. विविध जाती-धर्मांतील नागरिकांनी एकत्र येत आपुलकीने दिवाळी फराळाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक मझहरभाई कागदी, भादी काका, माजी उपनगराध्यक्ष फारुखभाई पटवेकर, माजी नगरसेवक अशोकदादा पाटील, विजय दिवस समारोह समितीचे सचिव अॅड. संभाजीराव मोहिते, माजी नगरसेवक अॅड. सतीश पाटील, विजय वाटेगावकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन ढेकळे, मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, डॉ. काझी, युवा उद्योजक सलीमभाई मुजावर यांच्यासह शहरातील अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.
तसेच छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुपमधील एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ, भला माणूस प्रतिष्ठान, शिवाजीनगर हाउसिंग सोसायटी आणि बागेतील गणपती ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फारुखभाई पटवेकर : अशा कार्यक्रमांमुळे गावाचे गावपण वाढते
माजी उपनगराध्यक्ष फारुखभाई पटवेकर यांनी मनोगत व्यक्त करताना हिंदू-मुस्लिम ऐक्य, बंधुता आणि सर्वधर्मसमभाव वृद्धिंगत करण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे समाजातील परस्पर विश्वास वाढतो. विविध धर्मांचे नागरिक एकत्र येतात आणि आपुलकीची भावना निर्माण होते. यामुळे आपल्या गावचे गावपण अधिक समृद्ध होते. छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप आणि सहयोगी संस्थांनी घेतलेल्या या पुढाकाराचे त्यांनी विशेष कौतुक करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
अॅड. संभाजीराव मोहिते : दिवाळी फराळ हे निमित्त; भाईचारा निर्माण करणे हाच मुख्य हेतू
विजय दिवस समारोह समितीचे सचिव अॅड. संभाजीराव मोहिते यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, दिवाळी फराळ करणे हे केवळ निमित्त आहे. या माध्यमातून हिंदू-मुस्लिम आणि सर्व जाती-धर्मांतील नागरिकांना एकत्र आणणे व त्यांच्यामध्ये भाईचारा निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. देशाच्या विकासासाठी सर्व धर्मांच्या नागरिकांनी एकत्र आले पाहिजे. आपल्यातील जाती-धर्माच्या भिंती दूर करून प्रत्येकाने एकमेकांच्या हातात हात घालून सहकार्य केले पाहिजे. प्रत्येकाला आपल्या जाती-धर्माचा अभिमान असलाच पाहिजे; मात्र आपली जात आणि धर्म घराच्या उंबरठ्यापर्यंतच मर्यादित असावा. घराबाहेर रस्त्यावर आल्यानंतर आपण सर्व भारतीय आहोत, ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मुनीर मुल्ला : ४० वर्षांत कधीही धर्मावरून दुजाभाव अनुभवला नाही
श्री. मुनीर मुल्ला यांनी आपला अनुभव सांगताना सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण मांडले. ते म्हणाले, गेल्या ४० वर्षांपासून आपण डॉ. लाहोटी यांच्या दवाखान्यात काम करीत आहोत. मात्र आजपर्यंत त्यांच्याकडून आपल्याला कधीही धर्माच्या आधारावर दुजाभावाची वागणूक मिळालेली नाही. ही बाब आपण अभिमानाने सांगू इच्छितो. माणुसकीच्या नात्याला धर्माच्या सीमा नसतात, हे या अनुभवातून स्पष्ट होते.
मझहरभाई कागदी : मुस्लिम समाजातर्फेही असे उपक्रम राबविणार
माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ मुस्लिम कार्यकर्ते मझहरभाई कागदी यांनी छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुपच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. समाजातील ऐक्य आणि सलोखा वाढविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व मोठे आहे. यापुढे मुस्लिम समाजाच्या वतीनेही अशाच प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच विटा-खानापूर येथे लवकरच मोठा इज्तेमा होणार असून, त्यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ए. आर. पवार : प्रत्येक धर्म वेगळा, मात्र माणुसकी एकच
श्री. ए. आर. पवार यांनी आपल्या मनोगतात सर्वधर्मसमभावाचे महत्त्व विशद केले. प्रत्येक धर्माची प्रार्थना आणि उपासना पद्धती वेगळी असू शकते; मात्र माणुसकी ही सर्वांची एकच आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने इतर धर्मांचा आदर केला पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभाव जोपासणे व वृद्धिंगत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. विशेषतः तरुणांनी पुढाकार घेऊन आपल्या गल्ली, पेठ आणि परिसरात असे ऐक्याचे कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
चंद्रकांत जाधव : चांगल्या विचारांच्या माणसांनी समाजासाठी एकत्र येण्याची गरज
छत्रपती शिवाजी उद्यानाचे प्रमुख आणि वृक्षमित्र श्री. चंद्रकांत जाधव यांनी उद्यानाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय उपक्रमांची माहिती दिली. दिवाळी फराळ हा सर्वांनी एकत्र येण्याचा आनंददायी प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी उद्यानात विविध राष्ट्रीय कार्यक्रम, रमजाननिमित्त इफ्तार पार्टी, वर्धापन दिनानिमित्त सर्वधर्मीय कार्यक्रम आयोजित केले जातात. या उपक्रमांमध्ये सर्व धर्मांच्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले, चांगल्या विचारांची माणसे चांगल्या कामांसाठी लवकर एकत्र येत नाहीत; परंतु वाईट विचारांची माणसे वाईट कामांसाठी लवकर एकत्र येतात, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे समविचारी नागरिकांनी एकत्र येऊन समाजासाठी आणि गावासाठी राष्ट्रीय एकात्मतेचे कार्यक्रम सातत्याने आयोजित केले पाहिजेत.
प्रसाद पावसकर : डॉ. काझी यांनी पहाटे चार वाजता येऊन वाचविले प्राण
बागेतील गणपती ज्येष्ठ नागरिक ग्रुपचे प्रमुख श्री. प्रसाद पावसकर यांनी डॉ. काझी यांच्याबाबतचा हृदयस्पर्शी अनुभव सांगितला. गेल्या ४० वर्षांपासून आपण डॉ. काझी यांचे रुग्ण आहोत. एकदा पहाटे चार वाजता हृदयविकाराचा झटका आल्याच्या प्रसंगी डॉ. काझी यांनी घरी येऊन तातडीने उपचार केले आणि आपले प्राण वाचविले. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील या नात्यापलीकडे माणुसकीचे किती मोठे मूल्य आहे, याची प्रचिती या प्रसंगातून येते, असे त्यांनी सांगितले.
सलीमभाई मुजावर : अशा कार्यक्रमांसाठी सर्वतोपरी सहकार्य करू
मुस्लिम समाजातील युवा उद्योजक श्री. सलीमभाई मुजावर यांनी शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि सर्वधर्मीय स्नेहाचे कार्यक्रम वारंवार आयोजित होण्याची आवश्यकता व्यक्त केली. अशा उपक्रमांमुळे समाजातील अंतर कमी होते आणि परस्परांतील प्रेम व विश्वास वाढतो. भविष्यातही असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
अॅड. सतीश पाटील : चार पिढ्यांपासून मुस्लिम कुटुंबाशी जिव्हाळ्याचे नाते
माजी नगरसेवक अॅड. सतीश पाटील यांनी आपल्या कुटुंबाचा मुस्लिम कुटुंबाशी असलेला चार पिढ्यांचा जिव्हाळा उपस्थितांसमोर मांडला. आपल्या कुटुंबाचे आणि मुस्लिम घराण्याचे गेल्या चार पिढ्यांपासून घरोब्याचे संबंध आहेत. दोन्ही कुटुंबांमध्ये प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे नाते आजही कायम आहे, असे त्यांनी अभिमानाने सांगितले. ही आठवण सांगताना ते भावूक झाले. पिढ्यान्पिढ्या जपलेली माणुसकी आणि मैत्री हीच खरी सामाजिक एकात्मता असल्याचे त्यांच्या मनोगतातून अधोरेखित झाले.
सलीम शेख : भाईचारा वाढविण्यासाठी आम्हीही पुढाकार घेऊ
मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते श्री. सलीम शेख यांनी या कार्यक्रमामुळे हिंदू-मुस्लिम बांधवांमधील भाईचारा अधिक वाढीस लागेल, असा विश्वास व्यक्त केला. समाजात परस्परांना मदत करण्याची आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची भावना अधिक दृढ झाली पाहिजे. यासाठी आम्हीही नेहमी सर्वांना सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
चंद्रशेखर नकाते : ७८६ क्रमांकाची नोट आजही देवघरात जतन
श्री. चंद्रशेखर नकाते यांनी आपल्याकडे ७८६ क्रमांकाची नोट परमेश्वराच्या इच्छेने कशी आली आणि ती आजपर्यंत आपण कशा प्रकारे जतन करून ठेवली आहे, याचा अनुभव सांगितला. ही नोट आपण आजही देवघरात पूजनीय वस्तू म्हणून जतन केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या अनुभवानेही उपस्थितांचे लक्ष वेधले.
देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमात रंगत
या कार्यक्रमात गीतकार आदम पालकर, श्री. देवेंद्र साळुंखे आणि वाहिद पठाण यांनी देशप्रेमावर आधारित गीते सादर केली. त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनीही या गीतांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिराजभाई मोमीन सर यांच्या कविता आणि शेरोशायरी ठरल्या लक्षवेधी
छत्रपती शिवाजी उद्यानाचे संस्थापक सदस्य पैगंबरवासी शिराजभाई मोमीन सर यांनी स्वतः रचलेल्या कविता आणि शेरोशायरीचे बोर्ड व बॅनर कार्यक्रमस्थळी लावण्यात आले होते. या साहित्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. सामाजिक ऐक्य, बंधुता आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या साहित्यामुळे कार्यक्रमाला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले.
विजय दिवस समारोह समितीचे आवाहन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ए. आर. पवार यांनी केले, तर अॅड. संभाजीराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले. विजय दिवस समारोह समितीचे उपसचिव श्री. विलासराव जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी त्यांनी आगामी विजय दिवस कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थितांना समजावून सांगितली. या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
दिवाळी फराळाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या हिंदू-मुस्लिम बांधवांनी परस्परांचे अनुभव, आठवणी आणि विचारांची देवाणघेवाण केली. धर्म वेगवेगळे असले तरी माणुसकी, प्रेम, विश्वास आणि देशप्रेम या भावना सर्वांना एकत्र बांधतात, हा संदेश या स्नेहमेळाव्यातून देण्यात आला. कराडच्या सामाजिक ऐक्याची परंपरा अधिक दृढ करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवणारा ठरला.
Comments
Post a Comment